बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant ) कधी काय करेल याचा नेम नाही. सध्या ती एका पोस्टमुळे चर्चेत आहे. होय, कंगना राणौत (Kangana Ranaut statement on freedom) बरळली आणि राखीला इतका जबर मानसिक धक्का बसला की, तिला थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं. आता ही भानगड काय हे माहित करून घ्यायचं असेल तर तुम्हाला राखीने शेअर केलेला व्हिडीओ बघावा लागेल. राखी सावंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसतेय.
व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणते, ‘मित्रांनो, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नर्स माझी तपासणी करत आहे. मी आजारी आहे, शॉकमध्ये आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेली एक अभिनेत्री जे काही बरळली, त्याने मला जबर धक्का बसला. आपल्याला 1947 साली जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती, असं ती म्हणाली. मी माझ्या देशावर खूप प्रेम करते. मला माहितीये, तुम्हांलाही तुमच्या देशावर प्रेम आहे. अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. भीक तर तुला मिळाली आहे. भीक मागून तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल जिंकले, त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? मित्रांनो, ज्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत त्यामुळे मी खूप दु:खी आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य भीकेत मिळालं, असं लोक कसं बोलू शकतात. फक्त पद्मश्री मिळाल्यावर तुम्ही इतका मूर्खपणा करता, देश तुमच्या हाती सोपवल्यावर तुम्ही काय करणार? तुझा पद्श्री घे अन् घरी गप्प बस. तुला तर नरकातही जागा मिळणार नाही...’राखीला नेमकं काय झालं, हे कळायला मार्ग नाही. पण तूर्तास तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. कंगनाने अलीकडे एका कार्यक्रमात स्वातंत्र्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. आपल्याला 1947 साली जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य 2014 साली (भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर) मिळाले, असे ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावर सर्वस्तरावर टीकेची झोड उठली होती.