राखी सावंत सध्या आपल्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे. राखीने मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले आहे. हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण लपवून लपवून किती लपवणार? शेवटी राखीने स्वत:च लग्न केल्याची कबुली दिली. मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली. राखीच्या पतीचे नाव राकेश आहे. तो युकेचा राहणारा आहे. राखी व राकेशची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, याचाही खुलासा झालाय. राखीने स्वत: या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, हे सांगितले. मुलाखती दरम्यान राखी म्हणाली की, प्रभु चावला यांच्यासोबतची माझी एक मुलाखत पाहून तो माझा फॅन बनला. यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅपवर मॅसेज केला आणि आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. काहीच दिवसांत आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. एकदिवस त्याने मला अप्रत्यक्ष प्रपोज केले.
केवळ मला विचार करण्यासाठी वेळ दे, एवढेच म्हणाले. यानंतर बरेच दिवस गेले. पण या दिवसांत मी राकेशच्या प्रेमात असल्याचे मला जाणवले. हे सगळे अचानक झाले. अनेकांना विश्वास बसणार नाही, पण लग्नाच्या 15 दिवसांआधी मी पहिल्यांदा भेटले. तो भेटला आणि हाच तो, असे मला वाटले. माझ्या घरच्यांनाही तो आवडला. लग्नाच्या दिवशी माझी आई, माझा भाऊ हजर होते. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने आम्ही विवाह केला. आई होण्याची काही घाई नाही. 2020मध्ये मी प्लॉनिगं करणार आहे.