बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याचा 'रक्षाबंधन' (raksha bandhan) हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याची कमालीची चर्चा रंगली होती. अक्षय आणि त्याच्या टीमने या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही केलं होतं. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. १५ दिवसांमध्ये या चित्रपटाने अत्यंत किरकोळ कमाई केली आहे.
'रक्षाबंधन' रिलीज होण्यापूर्वी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेलं असं वाटलं होतं. मात्र, १५ दिवस उलटल्यानंतरही या चित्रपटाने फारशी कमाल केली नाही. या १५ दिवसांमध्ये ५० कोटी रुपयांची कमाई करण्यासही हा चित्रपट अयशस्वी ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बराच वाद निर्माण झाला होता. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी ७० कोटी रुपये खर्च करुन हा चित्रपट तयार केला होता. मात्र, या चित्रपटाने केवळ ४५. ३३ कोटींचा आकडा गाठला आहे.
रविवारी या चित्रपटाने १.८ कोटींची कमाई केली होती. तर सोमवारी या कमाईमध्ये ७ लाखांची भर पडली. परंतु, त्यानंतर कमाईच्या आकड्यांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. मंगळवारी या चित्रपटाने केवळ ६६ लाख रुपये कमाई केली असून बुधवारी या आकड्यांमध्ये आणखीनच घट झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत या चित्रपटाने केवळ ४५. ३३ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्याचा कल पाहता अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराजप्रमाणेच अक्षयचा रक्षाबंधन हा तिसरा चित्रपटही यावर्षी बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. या चित्रपटात अक्षयव्यतिरिक्त भूमी पेडणेकर, सादिया, सहेजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृति श्रीकांत या अभिनेत्री झळकल्या आहेत.