फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनाच निमंत्रण का? साऊथ मेगास्टार चिरंजीवीच्या सूनेचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:53 PM2019-10-20T13:53:00+5:302019-10-20T13:53:06+5:30
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांचा मेळा जमला. पण आता या कार्यक्रमावर साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सूनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान, कंगना राणौत, एकता कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी कलाकारांशी संवाद साधत गांधी विचारांवर चर्चा केली. पण आता या कार्यक्रमावर साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांच्या सूनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपासना ही चिरंजीवी यांचा मुलगा राम चरणची पत्नी आहे.
होय, मेगास्टार चिरंजीवी यांची सून उपासना हिने ट्विटरवर मोदींना एक पत्र लिहिते आहे. मोदीजी, तुमच्या कार्यक्रमाचे निमंत्रण हिंदी कलाकारांनाच का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
उपासना आपल्या पत्रात लिहिते,‘प्रिय नरेंद्र मोदीजी, भारताच्या दक्षिण भागात राहणा-या आम्हा सर्वांना आपले कौतुक आहे. देशाच्या पंतप्रधानपदी आपल्यासारखी व्यक्ती लाभल्याचा आम्हाला अभिमान आहे. पण दिग्गज व्यक्तीमत्त्व व सांस्कृतिक प्रतीकांचे प्रतिनिधित्व केवळ हिंदी कलाकारांपुरतेच मर्यादित राहिल्याबद्दल आम्हास खेद वाटतो. दाक्षिणात्य कलाकार व दाक्षिणात्य इंडस्ट्री दुर्लक्षित आहे, असे आम्हाला वाटते. जड मनाने मी या भावना व्यक्त करतेय. माझ्या या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, अशी आशा आहे.’
उपासनाच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या मुद्यावर बोलणे गरजेचे होते, तुम्ही पुढाकार घेतला, अशा शब्दांत अनेक नेटकºयांनी उपासनाला पाठींबा दिला आहे. उल्लेखनीय आहे की, मोदींच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात निर्माते दिल राजू ही एकच तेलुगू सेलिब्रिटी उपस्थित होती.