Join us

सलमानने बिश्नोईला धमकी द्यावी! बॉलिवूड दिग्दर्शकाचा भाईजानला अजब सल्ला, म्हणाला- "प्राणीप्रेम एवढं वाढलंय की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:23 AM

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमधून भाष्य केलं आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना पकडल्यानंतर संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे वळली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेत पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सलमान खानचंही नाव घेण्यात आलं होतं. त्यामुळे बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमधून भाष्य केलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट 

सुपरस्टारने हरीणीला मारल्याचा बदला घेण्यासाठी एक वकील गँगस्टर झाला. फेसबुकवरुन त्याने ७०० लोकांची गँग बनवली. त्यातून त्याने सुपरस्टारची जवळची व्यक्ती असलेल्या राजकीय नेत्याची हत्या केली. 

 

पोलीस त्याला पकडू शकत नाहीत कारण तो पोलिसांच्या सुरक्षिततेखाली तुरुंगात आहे. आणि त्याचा प्रवक्ता परदेशी आहे. एखाद्या लेखकाने सिनेमाची अशी कथा लिहिली असती तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता आणि त्याला बकवास म्हटलं गेलं असतं. 

सलमानने १९९८ मध्ये काळवीटची हत्या केली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई फक्त ५ वर्षांचा होता. २५ वर्ष बिश्नोईने हा राग मनात ठेवला. आणि आता ३० वर्षांचा असताना त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट सलमानला मारण्याचं असल्याचं तो सांगत आहे. प्राणीप्रेम एवढं वाढलं आहे की देव विचित्र जोक करत आहे? 

यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी सलमानला बिश्नोई गँगला धमकी देण्याचा सल्ला दिला आहे. "माझी इच्छा आहे की सलमानने बिश्नोईला सुपर काउंटर धमकी द्यावी. नाहीतर टायगर डरपोक असल्यासारखे दिसेल. एसकेने त्याच्या चाहत्यांसाठी हे केलं पाहिजे. तो बी पेक्षा मोठा आहे", असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी लॉरेन्स बिश्नोईबद्दल केलेलं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. त्यांच्या या ट्विटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :सलमान खानराम गोपाल वर्मासेलिब्रिटी