Join us

राम गोपाल वर्मांनी सर्वांसमोरच केला बिग बींबाबत गौप्यस्फोट

By admin | Published: March 02, 2017 12:20 PM

अमिताभ बच्चन यांना घेऊन केलेल्या 'त्या' सिनेमांबाबत पश्चाताप होत आहे, असा खुलासा राम गोपाल वर्मा यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2 - बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांचा आगामी 'सरकार -3' या मल्टिस्टारर सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांसमोर बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. 
 
यावेळी 'अमिताभ बच्चन यांच्यासोबत असा कोणता सिनेमा केला आहे, ज्यामुळे तुम्हाला आताही पश्चाताप होत आहे?', असा प्रश्न राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले की, 'सरकार सीरिज व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या सिनेमांबाबत पश्चाताप होत आहे. मी कोणत्या एका सिनेमाचे नाव घेणार नाही, मी त्या सर्व सिनेमांबाबत बोलत आहे, जे 'सरकार' सिनेमाच्या तुलनेत बॉक्सऑफिस तितकं गाजवू शकले नाहीत. सरकार सीरिजलाच मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. '
'सरकार' माझ्या कारर्किदीतील सर्वाधिक प्रभावशाली सिनेमा आहे.  मी अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहत पाहत मोठा झालो आणि दिग्दर्शक बनलो आहे. अमिताभ यांच्या सिनेमांमध्ये ज्याप्रकारे वजनदार अभिनय पाहायला मिळतो तसा अभिनय अन्य कोणी अभिनेता करू शकत नाही. 'सरकार -3' ची एक महत्त्वपूर्ण बाब ही अशी आहे की, अमिताभ बच्चन यांनी जी भूमिका साकारली आहे, त्यातील राग हा एखाद्या सर्वसामान्याप्रमाणे उफाळून येतो.  
 
अँग्री अवतार असलेल्या भूमिकांमध्ये त्यांना मोठा स्टारडमदेखील मिळाला. त्यांचा हाच 'अँग्री अवतार' मी 'सरकार' सीरिजमध्ये उतरवला आहे', असे सांगत रामगोपाल वर्मा यांनी बिग बींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. दरम्यान, 'सरकार -3' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासहीत जॅकी श्रॉफ, रॉनित रॉय, मनोज वाजपेयी, यामी गौतम, अमित साध, सुप्रिया पाठक आणि रोहणी हट्टंगडी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 7 एप्रिल रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.