Join us

"श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला...", अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:09 IST

प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

'पुष्पा' फेम साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सर्वच स्तरातून याबाबत चर्चा होत आहे. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंग दरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरच्याबाहेर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. याबाबत आता बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत ट्वीट करताना श्रीदेवीचा उल्लेख करत एका प्रसंगाची आठवण करून दिली आहे. शिवाय आता पोलीस श्रीदेवीला अटक करायला स्वर्गात जातील का? असा प्रश्नही त्यांनी या ट्वीटमधून विचारला आहे. "प्रत्येक सेलिब्रिटीने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे. प्रसिद्ध असणं हा कोणत्याही सेलिब्रिटीसाठी गुन्हा आहे का? मग तो फिल्म स्टार असो वा राजकीय सेलिब्रिटी...क्षण क्षणम् या माझ्या सिनेमाचं शूटिंग सुरू असताना श्रीदेवीला बघण्यासाठी जमलेल्या लाखोंच्या गर्दीत तिघांचा मृत्यू झाला होता. मग तेलंगणा पोलीस स्वर्गात जाऊ श्रीदेवीला अटक करतील का?", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राम गोपाल वर्मा यांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला १४ डिसेंबरला अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर आणि संपूर्ण रात्र तुरुंगात काढल्यानंतर शनिवारी सकाळी अल्लू अर्जुनची सुटका करण्यात आली. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनश्रीदेवीराम गोपाल वर्मापुष्पा