टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा राम कपूर (Ram Kapoor) सध्या चर्चेत आहे. त्याने एका वर्षात तब्बल ५५ किलो वजन कमी केलं आहे. त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत रामने त्याच्या करिअरमधील अनेक किस्से सांगितले. यावेळी त्याने 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचं कौतुक केलं आहे. राखीने २००९ साली तिचं स्वयंवर आयोजित केलं होतं तेव्हापासून तो राखीला ओळखतो.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत राम कपूर म्हणाला, "राखी सावंतला कोण ओळखत नाही. तिचा मुंबईत समुद्रकिनारी ३ बीएचके फ्लॅट आहे. रिस्पेक्ट बॉस! तिने स्वत:च्या मेहनतीने हे यश मिळवलं आहे. मला तिचं फार अप्रूप वाटतं. बऱ्याचदा ती काहीही विचित्र बोलते तरी ती जे काय करते ते स्वत:च्या जीवावर करते आणि हे मी पाहिलं आहे."
तो पुढे म्हणाला, "एक टॅलेंटेड, सेक्सी डान्सर जिचा इंडस्ट्रीने केवळ गैरवापर केला. तिला फार वाईट अनुभव आले आहेत. तिचा कोणीही गॉडफादर नव्हता...कोणी नव्हतं. हे सगळं मी 'राखी का स्वयंवर' वेळी पाहिलं आहे. म्हणूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीतून काही तरी शिकत असता."
राम कपूरने 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कसम से','घर एक मंदिर','बडे अच्छे लगते है' या मालिकांमधून काम केलं आहे. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांवर प्रभाव पाडला. 'उडान','स्टुडंट ऑफ द इयर','नीयत' या सिनेमांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत.