राम कपूरने ५१ व्या वर्षी तब्बल ५५ किलो वजन कमी करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वजन घटवल्यानंतर राम कपूरने त्याच्या सोशल मीडियावरुन फोटो शेअर केला होता. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. राम कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वेट लॉस जर्नीबद्दल भाष्य केलं.
राम कपूरने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. १४० किलो वजन असलेल्या राम कपूरने सहा महिन्यात तब्बल ५५ किलो वजन घटवलं. या जर्नीबाबत तो म्हणाला, "नीयत आणि जुबली सिनेमात काम करताना माझं वजन सगळ्यात जास्त होतं. तेव्हा माझं वजन १४० किलो होतं. त्या भूमिका माझ्या व्यक्तिरेखेला अनुसरुण होत्या. पण, मी मात्र अस्वस्थ होतो. १०-२० पावलं चालल्यावरही मला धाप लागायची. मला डायबिटीजही झाला होता. तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे मला साधी हालचाल करायलाही जमत नव्हतं".
"तेव्हा मला हे जाणवलं की मला वजन कमी केलं पाहिजे. मागच्या सहा महिन्यात मी ५५ किलो वजन कमी केलं आहे. यासाठी मी स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित करायचो. आता माझं वजन ८५ किलो आहे. हा बदल चांगला आहे. पहिल्याच्या तुलनेत आता माझ्यात बराच बदल झाला आहे. आता मी न थांबता १२ तासही चालू शकतो. मी २५ वर्षाचा असल्यासारखं मला भासत आहे", असंही पुढे राम कपूरने सांगितलं.
राम कपूर यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. 'हमशकल', 'बार बार देखो', 'स्टुडंट ऑफ द इयर', 'थप्पड', 'द बिग बुल', 'नीयत' या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.