Join us

अयोध्यानगरी पाहून भारावून गेला 'हनुमान'; 'रामायण'फेम अभिनेत्याने पंतप्रधान मोदींना दिली रामाची उपमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 1:00 PM

Vindu dara singh: विंदू दारा सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सध्या सगळे देशवासी प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटी, दिग्गज मंडळी अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, काही जण अयोध्येमध्ये पोहोचलेदेखील आहेत. यामध्येच अभिनेता विंदू दारा सिंह (Vindu dara singh) नुकतेच अयोध्यानगरीत पोहोचले असून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विंदू दारा सिंह यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना सुद्धा अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. विशेष म्हणजे या पावननगरीत पोहोचल्यावर ते भारावून गेले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

"१६ ते २२ जानेवारी या कालात अयोध्येमध्ये होणाऱ्या रामलीला या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आलं आहे. या रामलीलामध्ये मी भगवान शंकराची भूमिका साकारणार आहे. जगातील महत्त्वाच्या तिर्थस्थळांमध्ये आयोध्या कायम प्रथम स्थानावर राहील. असं म्हटलं जातं की कलियुगातही सत्ययुग येणार आहे. आणि, ते होतांना दिसतंय. हे आपले रामजीच आहेत. मोदीजी आणि योगीजी आपल्या देशासाठी खूप मेहनत करत आहेत. खूप छान वाटतंय इथे येऊन. मोदीजींनी तर हे करुन दाखवलंच आहे. पण, त्यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी या कार्याला हातभार लावला त्यांनीही खूप छान काम केलंय. अयोध्या टॉप धार्मिक स्थळांपैकी एक होणार आहे", असं विंदू दारा सिंह म्हणाले.

दरम्यान, अयोध्येमध्ये १६ ते २२ या ७ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात वेळी सादर होणाऱ्या रामलीलामध्ये विंदू दारा सिंह हे परफॉर्म करणार आहेत. या रामलीलामध्ये ते भगवान शंकराची भूमिका साकारणार आहेत. प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात देशभरातील सेलिब्रिटी, नामांकित व्यक्ती, दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे.   

यात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, विराट कोहली, अनुष्का शर्मा, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. यात रामायण फेम अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी ही कलाकार मंडळी सुद्धा राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.

टॅग्स :अयोध्याराम मंदिरनरेंद्र मोदीयोगी आदित्यनाथबॉलिवूड