गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्यानंतर भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सगळेच आपल्या घरात राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होते. त्यावेळी लोकांच्या मागणीवरून रामानंद सागर यांची रामायण ही मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा दाखवण्यात आली होती. या मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड गेल्यावर्षी मोडले होते आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रामायण पाहायला मिळणार आहे.
लोकांच्या आग्रहास्तव रामायण ही मालिका पुन्हा सुरू करण्यात येणार असून प्रेक्षकांना स्टार भारत या वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे. कोरोनाची दुसरी लाट भारतात आली असून अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांसाठी संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत लोकांचे घरी बसून मनोरंजन व्हावे या हेतूने ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना पछाडत, टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामायण ही मालिका 2015 पासून आत्तापर्यंतची सर्वाधिक टीआरपी मिळवणारी हिंदी जनरल एंटरटेनमेंट मालिका ठरली होती.
अरूण गोविल यांनी रामायणमध्ये साकारलेली रामाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. इतक्या वर्षानंतरही रामायण मालिकेतील कलाकारांची आजही जादू कायम आहे. त्यामुळे आजही अरूण गोविल टीव्हीवरचे राम म्हणूनच ओळखले जातात. या मालिकेत सीतेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया तर लक्ष्मणाच्या भूमिकेत सुनील लहरी हा अभिनेता दिसला होता.