'काश्मीर फाइल्स' नंतर आता अभिनेत्री यामी गौतमचा 'आर्टिकल 370' नावाचा काश्मीरवर आणखी एक चित्रपट येत आहे. 'आर्टिकल 370' चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचं पात्र साकारलेल्या व्यक्तीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटात कोणत्या व्यक्तीनं पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे? जाणून घेऊयात...
चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका एका नामांकित अभिनेत्याने साकारली आहे. या अभिनेत्याविषयी नेटकरी गुगलवर सर्च करू लागले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत चक्क रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे आहेत. अरुण गोविल यांना मोदींच्या लूकमध्ये पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. त्यांच्या अभिनयाचं सध्या जोरदार कौतुक होत आहे. अरुण गोविल यांना लोक टीव्हीवरचे 'राम' म्हणूनही ओळखतात.
ट्रेलरमध्ये काश्मिरमध्ये घडणाऱ्या घटनांची झलक दिसते. यात अरुण गोविल हे पंतप्रधानाच्या भुमिकेत पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना दिसून येत आहेत. पहिल्याच क्षणी मोदींच्या भुमिकेत अरुण गोविल आहेत, हे ओळखूही येत नाहीये. त्यांचा लूक हुबेहुब मोदींना प्रमाणे करण्यात आला आहे. फक्त ऐवढेच नाही तर चित्रपटात गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका किरण करमरकर यांनी साकारली आहे.
काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. यावरच आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात यामी एका दमदार एनआयए ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी केले असून आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आर्टिकल या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.