ऐंशीच्या दशकात रामानंद सागर यांची रामायण ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका सुरू असताना लोक टिव्हीची पूजा करायचे, एखाद्या मंदिरात आपण आहोत या भावनेने ही मालिका त्यावेळी पाहिली जायची. रामायण या मालिकेतील सगळेच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेची लोकप्रियता त्या काळात इतकी होती की, कलाकारांना लोक देवच मानायला लागले होते. या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती. ही भूमिका त्याकाळात चांगलीच गाजली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
संजय जोग यांचे वडील मुकूंद जोग आणि आजोबा नाना जोग यांनी दोघांनीही मराठी रंगभूमीला आपले योगदान दिले आहे. संजय यांनी देखील आपल्या कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. संजय यांनी रामायणाप्रमाणेच नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात काम केले होते. त्यांनी मराठीसोबतच जिगरवाला, हमशकल या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही भरत या व्यक्तिरेखेमुळेच मिळाली. संजय जोग यांचे अवघ्या चाळीशीत निधन झाले. त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रात असून जोग कुटुंबियांची चौथी पिढी आता या क्षेत्रात काम करत आहे.
संजय जोग यांच्या मुलाचे नाव रणजीत असून तो सध्या हॅम्लेट या नाटकात काम करत आहे. तो गेल्या १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. जिंदगी तेरी मेरी कहानी या हिंदी तर कुंडली, दुर्वा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. त्याने मालिकांसोबतच लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.