Join us

Ramayan :  रावणवध झाला, मात्र ‘निराश’ नेटक-यांची चर्चा थांबेना! जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:10 AM

अनकट व्हर्जन दाखवण्याची मागणी

ठळक मुद्देदरम्यान नेटक-यांच्या या सर्व आरोपांवर प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात पुन्हा प्रसारीत झालेल्या रामायण या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नुकताच या मालिकेत रावणाचा वध करण्यात आला. राम-सीता अयोध्येतही परतले. मात्र   सोशल मीडियावर मात्र रामायणातील रावणवधाची चर्चा अद्यापही थांबलेली नाही.  होय, मालिकेचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक निराश आहेत.  रावणवधाचे सीन्स एडिट केल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला असून यावरून दूरदर्शनला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

रावणवधादरम्यान अनेक सीन्स कट केले गेलेत, असा आरोप करत नेटक-यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. रावणाचा भाऊ अहिरावण यांना दाखवण्यात आले नाही. वनवासातून परतलेल्या लक्ष्मणाची उर्मिलासोबतच्या भेटीचा उल्लेख गाळण्यात आला, अशा एक ना अनेक तक्रारी नेटक-यांनी केल्या आहेत. शिवाय रामायणाचे अनकट व्हर्जन दाखवा, अशी मागणीही नेटक-यांनी लावून धरली आहे.रामायणातील अनेक सीन्स दाखवले गेले नाहीत, यामुळे मी प्रचंड निराश झालो आहे, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने भगवान हनुमानाच्या सीन्सचा उल्लेख केला.

 एका दृश्यात हनुमान आपली छाती फाडून त्यात राम-सीतेची प्रतीमा दाखवतो, हा सीन रामायणातून गायब दिसला, अशी तक्रार या युजरने केली. अहिरावण राम व लक्ष्मणाचे पाताळात अपहरण करतो, ते दृश्य न दाखवल्याचा शिवाय हनुमानाचा मुलगा मकरद्वजही न दाखवल्याचा आरोपही एका नेटक-याने केला. 

रामायण हे रामानंद सागर यांची एक अप्रतिम कलाकृती आहे. ती कुठलीही छेडछाड न करता दाखवायला हवे होते, असा सूरही नेटक-यांनी आळवला आहे.

प्रसार भारतीने दिले स्पष्टीकरण

दरम्यान नेटक-यांच्या या सर्व आरोपांवर प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘आम्ही कोणताच भाग कापलेला नाही. मूळ प्रॉडक्शनमध्येच ते सीन्स नव्हते’, असे त्यांनी म्हटले आहे. अनेक कथा, त्यातही छोटे-छोटे भाग आणि प्रत्येक भागाचे विविध स्पष्टीकरण हे आपल्या महाकाव्यांचे सौंदर्य आहे. एक टेलिव्हिजन स्क्रिप्टमध्ये हे सगळे सामावू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :रामायण