रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील राम, लक्ष्मण आणि सीता यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. या ऐतिहासिक क्षणाचे ते साक्षीदार राहिले. 'रामायण'च्या लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri) अयोध्येतून परत आल्यानंतरही अजून त्याच आठवणीत आहेत. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रामललाच्या प्रसादात नक्की काय काय होतं याची झलक दाखवली आहे.
सुनील लहरी व्हिडिओ शेअर करत म्हणाले,'सर्व रामभक्तांना श्रीराम! रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला काय प्रसाद मिळाला हे जाणून घ्यायचंय? बघा...यामध्ये आहे स्टीलचा डबा ज्यात बेसनाचे लाडू आहेत, त्यानंतर एक तुळशी माळ, रुद्राक्ष, तांदूळ, धागा, शबरीचे बोरंही आहेत. कुंकू, केसर,निरांजन आणि गंगाजल आहे.इतकंच नाही तर एक मोठा डबा मिळाला आहे प्रसादाचा. ज्यामध्ये लाडू, खडीसाखर आणि आणखी गोड पदार्थ आहेत.'
ते पुढे म्हणाले,'जे लोक या प्राणप्रतिष्ठेचा भाग बनू शकले नाहीत सर्वांनाच यायची इच्छा होती पण ते अशक्य होतं. त्यामुळे मी विचार केला की हा प्रसाद छोट्या छोट्या पिशवीत भरुन मी माझ्या जवळच्या, ओळखीतल्या सर्व मित्रपरिवारापर्यंत पोहोचवेन. जेणेकरुन त्यांनाही या प्राणप्रतिष्ठेचा भाग झाल्यासारखे वाटेल."
सुनील लहरींच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी 'जय श्रीराम'म्हटले आहे. तसेच हे दाखवण्यासाठी त्यांचे आभारही मानले आहेत. सुनील लहरी यापूर्वीही अयोध्येत गेले होते. तेव्हा प्रभू श्रीरामाची मूर्ती एका तंबूत पाहून वाईट वाटल्याचं ते म्हणाले होते. आता त्याच जागी भव्य राम मंदिर उभारण्यात आलं असून सुनील लहरी स्वत: या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.