रामायण या मालिकेला ऐंशीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण या कार्यक्रमांची आठवण आली होती. रामायण या मालिकेचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती. ही भूमिका त्याकाळात चांगलीच गाजली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
संजय जोग यांचे वडील मुकूंद जोग आणि आजोबा नाना जोग यांनी दोघांनीही मराठी रंगभूमीला आपले योगदान दिले आहे. संजय यांनी देखील आपल्या कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. संजय यांनी रामायणाप्रमाणेच नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात काम केले होते. त्यांनी मराठीसोबतच जिगरवाला, हमशकल या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही भरत या व्यक्तिरेखेमुळेच मिळाली. संजय जोग यांचे अवघ्या चाळीशीत निधन झाले. त्यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रात असून जोग कुटुंबियांची चौथी पिढी आता या क्षेत्रात काम करत आहे.
संजय जोग यांच्या मुलाचे नाव रणजीत असून तो सध्या हॅम्लेट या नाटकात काम करत आहे. तो गेल्या १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. जिंदगी तेरी मेरी कहानी या हिंदी तर कुंडली, दुर्वा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. त्याने मालिकांसोबतच लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.