लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना त्यांची आवडती रामायण ही मालिका पाहायला मिळाली होती. रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्यात आल्याने या मालिकेचे फॅन्स प्रचंड खूश झाले होते. आता अनेक वर्षांनी ही मालिका आणि या मालिकेत काम करणारे कलाकार चर्चेत आले आहेत. राम, रावण, सीता, लक्ष्मण, भरत, कैकयी, दशरथ तसेच अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा शोध लोक सोशल मीडियाद्वारे घेत आहेत. या मालिकेत विभिषणची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
रामायण या मालिकेत विभिषणची भूमिका प्रसिद्ध अभिनेते मुकेश रावल यांनी साकारली होती. या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. आजही प्रेक्षकांना त्यांनी साकारलेली भूमिका चांगलीच लक्षात आहे. मुकेश यांनी रामायण या मालिकेसोबतच अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले होते. वो फिर आयेगी, क्रांतीवीर, शस्त्र, औजार, मृत्युदाता, विश्वविधाता, कोहराम या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या निधनाच्या काही वर्षं आधी ते शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या रा वन या चित्रपटात देखील झळकले होते. तसेच त्यांनी लव कुश, सीआयडी, कभी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले होते. मुकेश हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्यांचा अंत अतिशय वाईट झाला होता. ट्रेन अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांचा अपघात इतका भयंकर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्याचा मुलगा आजही सावरलेला नाहीये.
साथियो चलो खोडलधाम हा मुकेश यांचा शेवटचा चित्रपट ठरला. हा एक गुजराती चित्रपट होता. तसेच त्यांचे निधन होण्यापूर्वी नस नस में खुन्नस या गुजराती मालिकेत ते काम करत होते.