Join us

लॉकडाऊनमुळे अडकली ही ज्येष्ठ मराठी अभिनेत्री, रामदास आठवलेंनी घरी दिला आसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 11:02 AM

 ‘धुमधडाका’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘प्रियत्तमा प्रियत्तमा’ हे लोकप्रिय गाणे आठवत आले तर त्यात लटके-झटके दाखवणारी अभिनेत्रीही तुम्हाला आठवत असेलच.

ठळक मुद्देऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘धूमधडाका’ सिनेमात काम केले. 

 ‘धुमधडाका’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘प्रियत्तमा प्रियत्तमा’ हे लोकप्रिय गाणे आठवत आले तर त्यात लटके-झटके दाखवणारी अभिनेत्रीही तुम्हाला आठवत असेलच. होय, सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे. याच ‘प्रियत्तमा’वर कधीकाळी हक्काच्या पेन्शनसाठी मंत्रालयाच्या पाय-या झिजवण्याची वेळ आली होती. सध्या हीच अभिनेत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या घरी आश्रयास आहे. होय, लॉकडाऊनच्या काळात आठवले यांनी ऐश्वर्या राणे यांना आसरा दिला आहे. गत 15 एप्रिलपासून ऐश्वर्या आठवलेंच्या घरी मुक्कामास आहेत.

ऐश्वर्या राणे या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या असताना लॉकडाऊनमुळे पोलिसांनी त्यांना कोकणातील अर्ध्या वाटेवरच अडवले व पुन्हा मुंबईकडे जाण्याचे आदेश दिले. त्यातच ऐश्वर्या यांचे सर्व सामान व कपडे चोरीस गेले. अशा अवस्थेत   ऐश्वर्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेवून सर्व परीस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर आठवले यांनी ऐश्वर्या राणे यांना स्वत:च्या घरात आसरा दिला. जोपर्यंत लॉकडाऊनचा काळ संपत नाही तोपर्यंत माझे घर हे आपलेच घर समजा, असे आठवले यांनी ऐश्वर्यांना सांगितले़.

 सध्या त्या आठवले यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणूनच राहत आहेत. त्यांनी स्वत: ही माहिती दिली. सिंधुदुर्ग येथे रहावयास स्वत:चे छोटेसं घर मिळावे, यासाठी आपली विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘धूमधडाका’ सिनेमात काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘भटकभवानी’ या सिनेमातही त्या झळकल्या. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या यांनी ग्रुप डान्स ते असिस्टंट पर्यंत काम केले आहे. मात्र कारकिर्द ऐन बहरात असताना अमिताभ यांच्या ‘मर्द’ चित्रपटादरम्यान अमृता सिंग यांच्या बॉडीडबल बनलेल्या असताना घोड्यावरून पडून ऐश्वर्या यांना अपघात झाला. यात त्यांच्या पाठीचे हाड मोडले. याउपचारासाठी ऐश्वर्यायांना जवळचे असले नसले ते सगळे विकावे लागले. पुढे इंडस्ट्रीने काम देणे बंद केले, नातेवाइकांनीही पाठ फिरवली. आता सरकारी पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे.

टॅग्स :रामदास आठवलेअशोक सराफ