मुंबई – मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झालं आहे. रमेश देव(Ramesh Dev) यांच्या निधनानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ह्द्रयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता.
रमेश देव यांच्या निधनावर अनेक कलाकार शोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, मराठी, हिंदी सिनेमात विविध महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी साकारल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. उत्तम अभिनेता, चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्व गमावले. २ दिवसांपूर्वी माझं रमेश देव यांच्याशी फोनवरुन संवाद झाला होता. वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा दिल्या असं त्यांनी सांगितले.
रमेश देव १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून पाटलाचं पोर या सिनेमात काम केले होते. सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री सीमा देव यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अजिंक्य आणि अभिनय अशी २ मुले त्यांना आहेत. अजिंक्य देव चित्रपटात अभिनेते म्हणून काम करतात तर अभिनय हे दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटात पती-पत्नीची भूमिका निभावली आहे. रमेश देव यांनी आतापर्यंत २५० हून अधिक सिनेमात काम केले आहे.
रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण केलं. तर आरती या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी दिग्दर्शनासहित अनेक मालिका आणि नाटकांचीही निर्मिती केली आहे. २०१३ मध्ये ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रमेश देव यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डनं गौरवण्यात आलं होतं.