राणा दग्गुबतीला करावी लागली किडनी ट्रान्सप्लांट? जाणून घ्या काय आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 06:39 PM2019-07-24T18:39:51+5:302019-07-24T19:00:25+5:30
राणाची एक किडनी निकामी झाली असून त्याच्या आईने त्याला नुकतीच तिची एक किडनी दिली आणि हे ऑपरेशन अमेरिकेत झाले असे म्हटले जात होते.
२०१० मध्ये राणा दग्गुबतीने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने. या चित्रपटात त्याने साकारलेली भल्लाळदेवची भूमिका चांगलीच गाजली. आज राणाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आगामी चित्रपटासाठी लोक आतुरतेने वाट पाहात असतात. राणाच्या आरोग्याच्याबाबत काही दिवसांपूर्वी अनेक बातम्या फिरत होत्या. त्याची एक किडनी निकामी झाली असून त्याच्या आईने त्याला नुकतीच तिची एक किडनी दिली आणि हे ऑपरेशन अमेरिकेत झाले असे काही वेबपोर्टलने त्यांच्या बातमीत म्हटले होते.
राणा दग्गुबतीचे वजन देखील काही महिन्यात खूपच कमी झालेले आहे. यामागे देखील त्याचे आजारपण असल्याचे या वेबपोर्टलने त्यांच्या बातमीत म्हटले होते. या सगळ्यामुळे राणाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. राणाच्या फॅन्सनी आता त्यालाच सोशल मीडियाद्वारे किडनी ट्रान्सप्लांटविषयी विचारले आहे. राणाने नुकताच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने डिअर कॉम्रेड या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विजय देवेरकोंडा या अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याच राणाच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे चाहते त्याच्या तब्येतीविषयी विचारत आहेत. इन्स्टाग्रामला त्याच्या एका चाहत्याने विचारले आहे की, तेलगु एन्टरटेन्मेंटने तुमच्या किडनी ट्रान्सप्लांटविषयी बातमी दिली आहे, हे खरे आहे का? यावर राणाने एक मजेदार उत्तर दिले आहे. त्याने लिहिले आहे की, अशाप्रकारच्या बातम्या वाचणेच बंद करा.
तसेच राणाच्या एका फॅनने त्याचे वजन कमी होण्याविषयी त्याला विचारले आहे. त्याने त्यावर देखील अतिशय हटके पद्धतीने रिप्लाय दिला आहे. त्याने म्हटले आहे की, मी नेहमीच राक्षसासारखा दिसू शकत नाही ना...
राणाने विरता परम या चित्रपटाच्या चित्रीकरणातून सध्या ब्रेक घेतला असून तो अमेरिकेत आहे. तो अमेरिकेत कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी नव्हे तर त्याच्या एका खाजगी कामासाठी गेला आहे. तो काहीच आठवड्यात हैद्राबादला परतणार आहे.