बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. सध्या ऋषी यांचे भाऊ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांची मुलगी करिश्मा कपूर ऋषी आणि नीतूसोबत अमेरिकेत आहेत.
ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. ऋषी भारतात परतणार कधी याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. ऋषी कपूर यांची तब्येत कशी आहे याबाबत नुकतीच माहिती ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने दिली आहे. रणबीरने नुकतीच झी सिने पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्काराच्याआधी त्याने मीडियाशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्याला त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी विचारले असता त्याने सांगितले की, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून ते लवकरच परतणार आहेत. चित्रपटात काम करणे ते खूपच मिस करत आहेत. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे ते लवकरच परततील अशी मला आशा आहे.
ऋषी कपूर यांनी गेल्या वर्षी ट्वीट करून त्यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, मी काही महिन्यांसाठी कामातून ब्रेक घेऊन उपचार घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो की, माझ्या आजाराबाबत कोणतेही तर्क त्यांनी लावू नयेत. मी गेली 45 वर्षं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन.