गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नाव सातत्याने चर्चेत आहे. रणबीर सध्या Animal चं यश एन्जॉय करत आहे. Animal मध्ये रणविजय सिंह ही सायको भूमिका साकारल्यानंतर आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची चर्चा सुरू आहे. लवकरच तो बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या बिग बजेट 'लव्ह अँड वॉर' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत यात विकी कौशल, आलिया भट हेदेखील मुख्य भुमिकेत आहेत.
रणबीरने २००७ साली संजय लीला भन्साळी यांच्या सांवरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि आता 17 वर्षांनंतर तो पुन्हा त्यांच्यासोबत काम करणार आहे. रणबीर दुसऱ्यांदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार असल्याने यावेळी त्याने त्याच्या अटी आधीच सांगितल्या आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रणबीरने संजय लीला भन्साळींसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे, चित्रपटाचे शूटिंग दिलेल्या वेळेत पूर्ण झाले पाहिजे. कारण 'लव्ह अँड वॉर'नंतरही त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. निर्मात्यांनी रणबीरची ही अट मान्य केली असून शूटिंग नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू होईल आणि जुलै 2025 मध्ये संपेल असे सांगितले आहे.
रणबीरची दुसरी अट म्हणजे शूटिंगची वेळ किंवा तास निश्चित केले पाहिजेत. तिसरी अट आहे की प्रत्येक विभागात शिस्त असावी. रिपोर्टनुसार, आलिया भट्टमुळे रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी एकत्र आले आहेत. 'लव्ह अँड वॉर' 2025 च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाविषयी माहिती दिली होती. या सिनेमातून पहिल्यांदाच रणबीर, आलिया आणि विकी एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळींबरोबर विकी कौशलचा हा पहिलाच सिनेमा आहे.