राजकुमार हिराणी यांनी आजवर मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसारखे सरस चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संजू या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात रणबीर कपूरने संजूची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. रणबीरच्या करियरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट मानला जातो.
संजू या चित्रपटासाठी रणबीर कपूरला झी सिने पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना रणबीरने राजकुमार हे खूप चांगले व्यक्ती असून ते अतिशय चांगले फिल्ममेकर असल्याचे म्हटले आहे.
संजू या चित्रपटाच्या एका क्रू मेंबरने राजकुमार हिराणी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लावला होता. या आरोपानंतर ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या यादीतून राजकुमार हिराणीचे नाव वगळण्यात आले होते. हे प्रकरण बरेच गाजले होते. काही हिराणींच्या विरोधात उतरले तर काहींनी त्या प्रकरणात ‘फेअर ट्रायल’ची मागणी केली. अर्थात हळूहळू प्रकरण निवळले आणि हिराणी सार्वजनिक समारंभात दिसू लागले. पण रणबीरने राजकुमार यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष केले असून त्यांच्यासोबत तो पुन्हा काम करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहेत आरोपएका महिलने राजकुमार हिराणी यांनी ९ एप्रिल २०१८ ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझे काम वाईट आहे, असे हिरानी यांनी सर्वांना सांगितले असते. त्यामुळे माझे भविष्य उद्ध्वस्त झाले असते, अशी व्यथा मेलमधून मांडली होती. दरम्यान हे सगळे आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, असे राजकुमार हिराणी म्हणाले होते.