बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt ) संतापल्याचं तुम्ही पाहिलचं. केवळ आलिया नाही तर सध्या अख्खं बॉलिवूड संतापलं आहे. होय, आलियाचे घरातील फोटो लीक झालेत आणि आलिया बिथरली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या प्रकारानंतर संताप व्यक्त केला. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्या पापाराझी कल्चरवर अनेकांनी भडास काढली. आता आलियाचा पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आलियाचे गुपचूप फोटो काढून ते लीक करणाऱ्या पब्लिकेशनवर रणबीर चांगलाच भडकला आहे. याविरोधात कठोर कारवाई करण्याचा त्याचा विचार आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर झालेल्या प्रकारामुळे प्रचंड संतापला आहे. सध्या तो तू झूठी मैं मक्कार या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आलियासोबत जे काही झालं, ते बघता सर्वप्रथम त्याने घराची सुरक्षा वाढवली आहे. जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडू नये. मुलगी राहाचे फोटो लीक करू नये, अशी विनंती रणबीरने पापाराझींना केली होती. शिवाय सर्वप्रथम पापाराझींनाच राहाचा चेहरा दाखवला होता. पण याऊपरही राहाच्या फोटोंसाठी एका पब्लिकेशनने रणबीर व आलियाच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे रणबीर प्रचंड रागात आहे. संबंधित पोर्टलविरोधात कठोर कारवाई करण्याचा विचार त्याने केला आहे. कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल त्याला कुठलीही तडजोड मान्य नाही. त्यामुळे तू झूठी मैं मक्कारच्या रिलीजनंतर तो याप्रकरणाबद्दल निर्णय घेणार आहे.
काय आहे प्रकरणआलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. नंतर तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला होता. आलियाने लीक झालेल्या फोटोसह पोस्ट शेअर केली होती. “तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते. अचानक कोणीतरी मला पाहतंय, असं मला जाणवलं. उठून वर बघितलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. मी हे बोलतेय कारण तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात...”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.