Join us

रणबीर कपूरला ईडीकडून समन्स, ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 3:51 PM

रणबीर कपूर अडचणीत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या Animal सिनेमामुळे चर्चेत आहे. मात्र त्याआधी रणबीर अडचणीत सापडला आहे. त्याला ईडीकडून समन्स मिळाला आहे. ६ ऑक्टोबरला रणबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत. महादेव ऑनलाईन लॉटरी प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आलं आहे. रणबीर कपूरसह इतरही काही बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच ईडीने महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप या कंपनीवर छापेमारी केली. यामध्ये तब्बल 417 कोटी रुपये जप्त केले. या कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामुळे आता हे सेलिब्रिटी देखील ईडीच्या रडारवर आहेत. या सेलिब्रिटींमध्ये रणबीर कपूरचंही नाव समोर आलं आहे. या प्रकरणी चौकशीसाठी त्याला ६ ऑक्टोबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत.

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. लग्नापेक्षा जास्त तर तो इव्हेंटच झाला होता. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या कंपनीसंदर्भात ईडीने छापेमारी केली असता लग्नाच्या इव्हेंटचीही ईडीने तपासणी केली. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी ४१७ कोटी रुपये जप्त केले. या सोहळ्यात १४ बॉलिवूड कलाकार आले होते. टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, सनी लियोनी,  राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली अजगर, विशाल ददलानी, नेहा कक्कड, भारती सिंह, भाग्यश्री, एली अवराम, पुलकित, क्रिती खरबंदा,कृष्णाभिषेक आणि नुसरत भरुचा यांचा समावेश आहे.

ईडीने ही कारवाई मुंबई, कोलकता आणि भोपाल या शहरांमध्ये केली होती. महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीचे इव्हेंट परदेशातही झाले होते. बॉलिवूड कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी रक्कम देण्यात आली होती. या इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईडीच्या कारवाईनंतर बॉलिवूडकरही चौकशीच्या कचाट्यात सापडले आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरअंमलबजावणी संचालनालयबॉलिवूड