Ranbir Kapoor : रणबीर कपूर आगामी 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhuthi Mai Makkar) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते. आता त्यावर स्पष्टीकरण देताना रणबीरचा सूर बदललेला दिसतोय. सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याला पुन्हा पाकिस्तानी सिनेमांबाबत प्रश्न विचारला असता रणबीरने कलेपेक्षा देशच मोठा असे वक्तव्य करत स्वत:चा बचाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या 'रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये रणबीर कपूरने पाकिस्तानी कलाकारांची तारीफ केली होती. तो म्हणाला होता, 'कलेला आणि कलाकाराला कोणतीही सीमा नसते. मला नक्कीच काम करायला आवडेल.'
याच वक्तव्यावर आता रणबीर कपूरने स्पष्टीकरण दिले आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याला विचारण्यात आले, 'तुला खरंच पाकिस्तानी सिनेमात काम करायचे आहे?' यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला. मी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालो होतो. तिथे अनेक पाकिस्तानी फिल्ममेकर्स होते. त्यांनी मला चांगला विषय असेल तर काम करणार का असे विचारले होते. मला कोणत्याच वादात अडकायचे नव्हते. मला नाही वाटत इतकी मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे. माझ्यासाठी फिल्म, फिल्म आहे. फिल्म एक कला आहे. मी फवादसोबत ऐ दिल है मुश्कील मध्ये कामही केले आहे. '
रणबीर पुढे म्हणाला, 'मी अनेक पाकिस्तानी कलाकारांना ओळखतो. राहत आणि आतिफ अस्लम तर कमाल गायक आहेत. त्यांनी हिंदी सिनेमासाठी काम केले आहे. म्हणूनच सिनेमा, सिनेमा आहे. मला नाही वाटत सिनेमासाठी कोणती सीमा असते. कलेचा आदर करायला हवा. पण कला देशापेक्षा मोठी नक्कीच नाही. जर आपल्या देशासोबत कोणाचे चांगले संबंध नसतील तर आपले प्राधान्य देशच असला पाहिजे.
'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा
रणबीर कपूरचा 'तू झुठी मै मक्कार' सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये रणबीर-श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही फ्रेश जोडी आहे. याशिवाय रणबीर 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.