मुंबई : 'संजू' सिनेमात संजय दत्त आयुष्यातील खरे सीन्स साकारणं रणबीर कपूरसाठी किती कठीण गेलं असेल हे वेगवेगळ्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर सांगतो आहे. खरंतर याचा अंदाज ट्रेलर पाहून कुणीही लावू शकतता. रणबीरच्या या मेहनतीचं सर्वांकडून कौतुकही केलं जात आहे. संजय दत्त साकारण्यासाठी रणबीरला अनेक अडचणी गेल्या. पण या सिनेमातील एक असा सीन आहे, जो करण्यासाठी रणबीरला सर्वात जास्त त्रास झाला. आजही हा सीन आठवला की निराश होत असल्याचं रणबीरने सांगितलं.
या सिनेमात जेव्हा संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्या मृत्यूचा सीन शूट केला जात होता, तेव्हा रणबीर सर्वात जास्त भावूक झाला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, 'संजय सरांच्या आईंच्या मृत्यूचा सीन सर्वात कठीण होता. त्या सीनवेळी मी फार भावूक झालो होतो. सीनमध्ये असं आहे की, सुनील दत्त यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्यामुळे त्यांनी संजय सरांना हॉस्पिटलमध्ये आईजवळ थांबायचं सांगितलं होतं. ते हॉस्पिटलमध्ये चार-पाच दिवस होते'.
रणबीर पु़ढे म्हणाला की, 'अचानक एक दिवस नर्गिस उठल्या आणि संजूसोबत बोलू लागल्या. त्यावेळी संजय सरांनी आपल्या आईला डोळ्यांदेखत मरताना पाहिलं. ही घटना संजय सरांच्या पहिल्या 'रॉकी' सिनेमाच्या प्रिमिअरच्या तीन दिवस आधी घडली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, मी असो वा नसो सिनेमाचा प्रिमिअर नक्की व्हायला हवा'.
रणबीरने सांगितले की, नर्गिस दत्त यांच्या निधनानंतर संजय सर सुनील दत्त यांच्यासोबत 'रॉकी' च्या प्रिमिअरला गेले होते. त्यावेळी ते फार घाबरलेले होते. भीतीमुळे संजय तिथून पळून गेले होते. सुनील दत्त बाहेर आले तेव्हा संजय यांनी त्यांना सांगितले की, 'मरतेवेळी आई उठली आणि माझ्याशी बोलली. पण मला हे कळत नाहीये की, आई खरंच उठली होती की ड्रग्सच्या नशेमुळे माझा तसा भ्रम झाला होता'.
रणबीर म्हणाला की, संजय दत्त यांच्याशी निगडीत या गोष्टीने मला भावनात्मक दृष्ट्या अस्वस्थ केले होते. त्या सीनवेळी मी फार घाबरलेलो होतो. त्यांना हे माहीत नाहीये की, त्यांची आई मरताना त्यांच्याशी बोलली किंवा नाही.