Join us

रणबीर-रणवीरने उडवली कतरिनाची खिल्ली..?

By admin | Published: November 16, 2016 4:41 PM

कॉफी विथ करण शोमध्ये रणबीर कपूर - रणवीर सिंगने अभिनेत्री कतरिना कैफच्या अबिनायाबाबत टीका करत तिची खिल्ली उडवली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ -  रणबीर कपूर आणि रणवीर सिंग.. बॉलिवूडचे दोन हार्टथ्रॉब्स जेव्हा एकत्र येतात तेव्हाचा नजारा काही औरच असतो. दीपिका पडूकोणसबोत हे दोघे पार्टीत थिरकल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. 
हे दोघे आता पुन्हा एकत्र आले असून यावेळी ते दिसणार आहेत 'कॉफी विथ करण'मध्ये... दिग्दर्शक करण जोहरचा हा शो अतिशय लोकप्रिय असून त्याचा पाचवा सीझन नुकताच सुरू झाला. पहिल्या भागात शाहरूख -आलिया , त्यानंतर ट्विंकल खन्ना - अक्षय कुमारच्या सिझलिंग केमिस्ट्रीमुळे या शोची बरीच चर्चा सुरू असून आता रणवीर -रणबीर यांना एकत्र आल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. या एपिसोडचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून करणने त्या दोघांसोबतचा फोटोही शेअर केला होता. 
रणवीर आणि रणबीर या दोघांचाही ' सेन्स ऑफ ह्युमर' उत्कृष्ट असल्याने तोच अंदाज शोमध्येही पहायला मिळेल यात शंका नाही. विशेष म्हणजे या शोमध्ये दोघांच्याही गप्पांचा कॉमन टॉपिक होता ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ .. वाचून आश्चर्य वाटलं ना, पण हो, हे खरं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शोमध्ये रणवीर सिंगने कतरिनाची खूप खिल्ली उडवली आणि तिचा माजी प्रियकर असणा-या रणबीर कपूरनेही त्याला न रोखता उलट साथच दिली. कतरिनाच्या अभिनयाची खिल्ली उडवत, ती सर्व प्रसंगामध्ये एकच भाव ठेवून वावरते, अशी टीकाही रणवीर सिंगने केल्याचे समजते. त्यावर रणबीरही हसत हसत सामील झाला होता. एवढचे नव्हे तर करणने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना 'माझं हृदय वगैरे काही तुटलेलं नाही' असं सांगत आपण ब्रेकअपमधून बाहेर पडल्याचेच रणबीरने स्पष्ट केले. 
गेल्या सहा वर्षांपासून एकत्र असलेल्या रणबीर- कतरिनाचे या वर्षाच्या सुरूवातीचा ब्रेकअप झाले होते. कतरिनाने हे नातं पुन्हा सांधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र रणबीरला तिच्यामध्ये काहीही रस उरलेला नसल्याने त्याने पुन्हा एकत्र येण्यास नकार दर्शवला होता. त्या दोघांनाही या मुद्यावर आत्तापर्यंत मौन राखणेच पसंत केले असले तरी एका टीव्ही शोमध्ये रणबीर- रणवीरने आपली खिल्ली उडवल्याचे पाहून कतरिनाला राग आला असेल हे मात्र नक्की..!