ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला.
रणधीर कपूर यांचे भाऊ ऋषी कपूर यांचे तसेच त्यांची बहीण रितू यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या सगळ्यामुळे कपूर कुटुंब कोलमडून गेले आहे. रणधीर कपूर अजूनही या दुःखातून सावरलेले नाहीत. त्यांनी नुकताच राजीव आणि ऋषी यांचा एक तरुणपणातील फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, मी तुम्हाला खूप मिस करतोय... तुम्ही जिथे असाल तिथे सुखात राहा...
ऋषी आणि राजीव यांच्या निधनामुळे मी पूर्णपणे कोलमडलो होतो असे रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. गेल्या काही महिन्यात माझ्या घरातील सदस्यांच्या एकामागे एक झालेल्या निधनामुळे मी संपूर्णपणे कोलमडून गेलो आहे. राजीवला कधीच कोणत्या प्रकारचा आजार नव्हता. राजीव खूपच खेळकर वृत्तीचा होता. तो आता आपल्यात नाही या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. आता मी त्या घरात एकटाच शिल्लक राहिलो आहे.
राजीव यांचे निधन झाले त्यावेळी रणधीर कपूर त्यांच्यासोबतच होते. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. राजीव यांची तब्येत अचानकपणे कशी खराब झाली होती याविषयी देखील रणधीर यांनी या मुलाखतीत सांगितले होते. रणधीर यांनी सांगितले होते की, मला आरोग्यसंबंधीत काही समस्या असल्याने माझ्यासोबत २४ तास एक तरी नर्स असते. माझ्यासोबत असलेली नर्स राजीवला सकाळी ७.३० वाजता उठवायला गेली तर तो काहीच उत्तर देत नव्हता. त्यामुळे नर्सने त्याच्या हृदयाचे ठोके मोजले तर ते खूप कमी होते आणि सतत कमी होत होते. त्यामुळे त्याला आम्ही लगेचच रुग्णालयात दाखल केले. त्याला आम्ही वाचवण्याचे सगळे प्रयत्न केले. पण त्यात आम्ही असमर्थ ठरलो.