बॉलिवूडमधलं गाजलेलं नाव म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukerji). आजवरच्या कारकिर्दीत राणीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. यात असेही काही सिनेमा आहेत जे तिच्या करिअरमधले माइलस्टोन ठरले आहेत. परंतु, असेही काही सिनेमा आहेत जे तिने किरकोळ कारणांसाठी नाकारले आणि नंतर तेच सुपरहिट ठरले. सध्या राणीने नाकारलेल्या अशाच एका सिनेाची चर्चा होतीये. आमिर खानची ( aamir khan)मुख्य भूमिका असलेला 'लगान' हा सिनेमा राणीने नाकारला. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर गाजलेला हा सिनेमा नाकारल्यामुळे राणीला आजही त्याचा पश्चाताप होतोय.
आमिर खानने या सिनेमाची निर्मिती केली असून दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे. या सिनेमात आमिरसह अभिनेत्री ग्रेसी सिंह मुख्य भूमिकेत झळकली होती. परंतु, तिच्यापूर्वी ही भूमिका राणीला ऑफर झाली होती. मात्र, तिने या सिनेमासाठी नकार दिला. 54 व्या इंटरनॅशलन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये राणीने हा सिनेमा नाकारण्यामागचं कारण सांगितलं आहे.
'तुझ्या या फिल्मी प्रवास असा कोणता सिनेमा आहे का जो हातून गेलाय आणि त्याचा तुला पश्चाताप होतोय?' असा प्रश्न राणीला विचारण्यात आला. त्यावर तिने लगानचं नाव घेतलं.
"खरं सांगायचं झालं तर वाईट वाटतंय अशातला भाग नाही. पण, दुर्दैवाने आमच्या तारखा जुळून येत नसल्यामुळे मी आमिर खानच्या लगान सिनेमाचा भाग होऊ शकले नाही. ज्यावेळी ते लगानची तयारी करत होते तेव्हाच त्यांनी मला हा सिनेमा ऑफर केला होता. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत होता. त्याची अशी इच्छा होती की या सिनेमात जितके कलाकार आहेत त्यांनी सहा महिने एकाच जागी म्हणजे गुजरातच्या भुजमध्ये एकत्र रहायचं. आणि, या सिनेमाचं शूटिंग संपेपर्यंत कोणताही इतर सिनेमा साईन करायचा नाही, या त्याच्या दोन अटी होत्या", असं राणी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "ज्यावेळी आमिरने मला या सिनेमाची ऑफर दिली त्यावेळी मी ऑलरेडी एक सिनेमा साईन केला होता. ज्याच्या २० दिवसांचं शुटिंग बाकी होतं. पण, आमीरने स्पष्ट सांगितलं की १०-१५ दिवसांसाठीही परत पाठवणार नाही. मला आमीरच्या लगानमध्ये काम करायचं होतं. त्यामुळे आधी साईन केलेला सिनेमा मी सोडायलाही तयार होते. याविषयी मी संबंधित सिनेमाच्या निर्मात्यांशी बोलले पण ते शक्य झालं नाही. आमिर माझा मित्र आहे आणि पहिल्यांदाच तो एका सिनेमाची निर्मिती करत होता त्यामुळे मला त्याच्या सिनेमात काम करायचं होतं. लगानचं शुटिंग संपल्यानंतर आमिरने मला म्हणाला, लोकांना ६ महिने एकाच जागी लॉक केल्यामुळे मला फार वाईट वाटतंय. कारण, मीच २० वेळा मुंबईचा दौरा केला."
दरम्यान, २००१ मध्ये 'लगान' रिलीज झाला. त्याच्यासोबत सनी देओलचा गदर:एक प्रेम कथा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. परंतु, या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं.