अभिनेत्री राणी मुखर्जीने (Rani Mukherjee) 'मिसेज चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' मधून दमदार कमबॅक केले. लग्न आणि लेकीच्या जन्मानंतर राणी फारशी सिनेमात दिसली नाही. मात्र 'हिचकी', 'मर्दानी', 'मिसेज चॅटर्जी' या सिनेमांमधून तिने पुन्हा आपलं टॅलेंट सिद्ध केलं. राणीला 'आदिरा' ही ७ वर्षांची मुलगी आहे. शिवाय राणी २०२० मध्ये पाच महिन्यांची गरोदर असतानाच तिचा गर्भपात झाला होता असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला.
'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' सध्या सुरु आहे. तेथील एका मुलाखतीत राणी म्हणाली, '2020 मध्ये मी पाच महिन्यांची गरोदर होते. मात्र माझा गर्भपात झाला. तो माझ्यासाठी कठीण काळ होता. याबद्दल मी आधी 'मिसेज नॉर्वे व्हर्सेस चॅटर्जी'च्या प्रमोशनवेळी सांगितले नाही कारण मी प्रमोशनल स्टंट करत असल्याचा लोकांचा समज झाला असता.'
ती पुढे म्हणाली,'कोव्हिडच्या वेळी लॉकडाऊन सुरु असताना मला प्रेग्नंसीविषयी समजलं. मात्र पाचव्या महिन्यात माझा गर्भपात झाला. या दु:खाच्या प्रसंगानंतर १० दिवसांनी मला निखिल अडवाणी यांचा मिसेज नॉर्वे व्हर्सेस चॅटर्जी साठी कॉल आला होता. तेव्हा त्यांना आणि दिग्दर्शक आशिमा छिब्बर दोघांना माझ्या या प्रसंगाची माहिती नव्हती.'
'मी सिनेमाची ऑफर स्वीकारली. या कठीण प्रसंगातून जात असताना तशाच प्रकारची स्क्रिप्ट माझ्याकडे आली म्हणून मी सिनेमा स्वीकारला. ना की मी नुकतंच बाळ गमावलंय म्हणून स्वीकारला. जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला विश्वासच बसला नाही की नॉर्वेसारख्या देशात एका भारतीय कुटुंबाला इतक्या कठीण संकटाला सामोरं जावं लागलं', असंही ती यावेळी म्हणाली.