प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचे दर्शन घडवणारा ‘रांजण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाची कहाणी प्रेमकथेवर आधारित आहे. ही प्रेमकहाणी मात्र इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक प्रकाश पवार ‘लोकमत सीएनएक्स’ला सांगताना म्हणाले, ग्रामीण भागात घडणारी ही कथा लहान मुलांच्या शिक्षण, प्रेम यांसारख्या वैविध्यपूर्ण भावविश्वाभोवती फिरते. यातील यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, पुष्कर लोणारकर यांच्या धम्माल अभिनयासोबत या चित्रपटाचा मुलांना आपल्या पालकांसोबत आनंद लुटता येईल. तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक प्रेमकथा आल्या, या सर्वांपेक्षा ‘रांजण’ वेगळा ठरणार आहे. 'रांजण'मध्ये एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमाची कथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते, मूलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही त्यातून व्यक्त होतो. या चित्रपटात यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, पुष्कर लोणारकर, अनिल नगरकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी या कलाकारांचा समावेश आहे. तसेच, या चित्रपटातील गाण्यांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील गाणी हिट झाली असल्याचे पाहायला मिळाले. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी रांजण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.
चित्रपटसृष्टीतील प्रेमकथेपेक्षा ‘रांजण’ वेगळा
By admin | Published: February 20, 2017 5:00 AM