'एक प्यार का नगमा' या गाण्याने रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आलेली रानू मंडल (Ranu Mandal) तुम्हाला आठवत असेलच. तिचे गायनाचे कौशल्य पाहून संगीतकार हिमेश रेशमियाने तिला मोठा ब्रेक दिला. मात्र, आता राणू तिच्या जुन्या आयुष्यात परतल्याचे दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तिने झोमॅटोचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे.
डान्सर अदिती नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटने नुकताच रानू मंडलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रानू मंडल ड्रेसवर झोमॅटो टी-शर्ट परिधान करून फ्रेममध्ये उभी आहे, तर अदिती तिच्याभोवती नाचत आहे. पार्श्वभूमीत वाजत असलेल्या गाण्याचे बोल आहेत 'मैं रानू, मुंबई की रानू'. या व्हिडिओला आतापर्यंत १.२४ लाख लाईक्स मिळाले आहेत. यावर नेटकरी एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, ''आता हिमेशजी कुठे गेले… त्यांची काळजी कोणी घेत नाही का?'' दुसऱ्या युजरने लिहिले, ''ती एक सेलिब्रिटी बनली होती, मग अचानक काय झाले?'', दुसरा म्हणाला, ''म्हणूनच ते म्हणतात की पैसा आणि गर्व जास्त काळ टिकत नाही...''
बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने रानू मंडलला त्याच्या सिनेमात गाण्याची संधी दिली होती. या सिनेमातील रानू मंडलने गायलेले गाणे तेरी मेरी कहानी खूप हिट झाले होते. मात्र कालांतराने रानू मंडलची अवस्था पुन्हा जैसे ते वैसे झाली. तिला मुंबईत काहीच काम मिळत नाही. सध्या रानू मंडल राणाघाटमधील बेगोपारा येथे राहत आहे. गेल्या काही दिवसांत तिने जे काही कमाविले त्यावर तिचा उदरनिर्वाह सुरू असल्याचे समजते आहे.