बॉलिवूडचा ‘पॉवरहाऊस’ अर्थात रणवीर सिंग ( Ranveer Singh) याचा आज वाढदिवस. आज 6 जुलैला रणवीर त्याचा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या अतरंगी फॅशनमुळे रणवीर सतत चर्चेत असतो. खरं तर रणवीरची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. पण त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी कदाचित आजही तुम्हाला ठाऊक नसतील.
रणवीर सिंगचं खरं नाव रणवीर भवनानी आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी त्याने ते बदललं. 50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री चांद बर्क यांचा तो नातू आहे. रणवीर हा सोनम कपूरचा मावस भाऊ आहे. सोनमची आई सुनीता कपूर हिच्या कुटुंबाशी रणवीरचं नातं आहे. आपल्या टॅलेंटच्या जोरावर रणवीरनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण तुम्हाला ठाऊक नसेल की, कधीकाळी याच रणवीरच्या मागे निर्मात्याने कुत्रा सोडला होता.
बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रणवीरला बराच संघर्ष करावा लागला. अगदी थिएटरमध्ये बॅकस्टेजवर कलाकारांसाठी चहा आणण्यापासून तर त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यापर्यंतचे पडेल ते काम त्याने केलं. पण 2010 मध्ये आदित्य चोप्राने रणवीरला ब्रेक दिला आणि रणवीरचा पहिलाच चित्रपट ‘बँड बाजा बारात’ सुपरहिट झाला.
रणवीर सिंगने एका मुलाखतीत त्याच्या बॉलिवूड डेब्यूपूर्वीच्या संघर्षमय दिवसांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, एका प्रसिद्ध निर्मात्याने(जो आता हयात नाही) त्याच्या मनोरंजनासाठी एका खाजगी पार्टीत रणवीर सिंगच्या मागे आपला कुत्रा सोडला होता. विशेष म्हणजे, त्या निर्मात्याने स्वतः रणवीरला पार्टीत बोलावले होते. रणवीरने त्या निर्मात्याचे नाव सांगण्यास नकार दिला होता.
कास्टिंग काउचचा बळीया सेशनमध्ये रणवीर सिंगने त्या काळातील कास्टिंग काउचचा अनुभवही सांगितला होता. तो म्हणाला की एक माणूस मला एका ठिकाणी बोलावतो आणि विचारतो, तू मेहनती आहेस की हुशार?. मी स्वतःला हुशार समजत नाही, त्यामुळे मी त्याला म्हणालो की, मी एक मेहनती व्यक्ती आहे. तर तो मला म्हणाला डार्लिंग, बी स्मार्ट, बी सेक्सी. त्या साडेतीन वर्षात असे सर्व प्रकारचे अनुभव आले आणि मला वाटते की हाच तो काळ होता, ज्याने मला घडवलं, अशी आठवण रणवीरने करुन दिली होती.