Box Office Collection : बॉलिवूडच्या सिनेमाला मराठी सिनेमा टक्कर देतोय, असं चित्र अभावानेच दिसतं. सध्या मात्र तेच घडतंय. होय, बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा (Ranveer Singh) ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘फुस्स’ झाला. याऊलट ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या मराठी सिनेमानं जोरदार गर्दी खेचतोय. ‘जयेशभाई जोरदार’चा बजेट ‘धर्मवीर’पेक्षा कितीतरी अधिक आहे. अशात बजेटचा विचार करता कमाईच्या बाबतीत ‘धर्मवीर’ चित्रपटानं अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरादार’ ( Jayeshbhai Jordaar ) चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
‘धर्मवीर’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट गेल्या 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.5 कोटींची दमदार कमाई करत, सगळ्यांना थक्क केलं. महाराष्ट्रभर 400 स्क्रिनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 3.17 कोटींचा गल्ला जमवला आणि तिसऱ्या दिवशी रविवारी 3.86 कोटींचा बिझनेस केला. तीनच दिवसांत या चित्रपटाने 9.08 कोटींची कमाई केली.
जयेशभाईनं तीन दिवसांत कमावले इतके कोटीरणवीरच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा होती. अलीकडे शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आला, तो आपटला. पाठोपाठ टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ या चित्रपटानंही प्रेक्षकांची निराशा केली. अगदी अजय देवगणचा ‘रनवे34’ हाही तितकाच दणकून आपटला. अशात रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ कमाल दाखवेल, असं वाटतं असताना हा चित्रपटही फेल ठरला. ‘जयेशभाई जोरदार’नं पहिल्या दिवशी 3.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 4 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 4.74 कोटींची कमाई केली. बजेटचा विचार करता ही कमाई काहीच नाही. त्या तुलनेत ‘धर्मवीर’ चित्रपटानं लक्षवेधी कमाई केली आहे.
बजेटचा विचार करता ‘धर्मवीर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.