बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २८ जुलैला प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रणवीर सिंहबरोबर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमासाठी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने खास पोस्ट केली होती.
अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं पोस्टर शेअर करत हा चित्रपट पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं होतं. या स्टोरीमध्ये अमृताने रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि करण जोहरला टॅग केलं होतं. अमृताची ही स्टोरी रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. याबरोबरच त्याने खास कॅप्शनही दिलं आहे. "अमृता तू खास आहेस. नेहमी प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा दिल्याबद्दल थँक्यू," असं कॅप्शन रणवीरने दिलं आहे. रणवीरच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिव ठाकरेला डेट करण्याच्या चर्चांवर बॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही एकमेकांना..."
रणवीरची स्टोरी पाहून अमृता खानविलकरही भारावून गेली आहे. अमृताने रणवीरची ही स्टोरी रिपोस्ट केली आहे. ही स्टोरी शेअर करत तिने इमोजी पोस्ट केले आहेत. दरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगही झळकली आहे. याबरोबरच शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
करण जोहरचा ;रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ११ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे १६. ५ आणि १८.७५ कोटींची कमाई केली होती. चार दिवसांत या चित्रपटाने ५३.४० कोटींची कमाई केली आहे.