निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग 'सिम्बा' सारख्या सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता लवकरच 'सर्कस' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीनेरणवीर सिंगसोबत सर्कस चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे रणवीर या सिनेमात डबल रोलमध्ये दिसणार आहे. रणवीर सिंग व्यतिरिक्त पूजा हेगडे, वरुण शर्मा आणि मुरली शर्मा हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग सध्या वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये सुरु आहे. रिपोर्टनुसार कुणालाही या गोष्टीचा पत्ता लागू नये म्हणून निर्मात्यांनी सिनेमाचे शूटिंग लपून-छपून सुरू केले आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीपर्यंत पूर्ण व्हायचे आहे. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग गोवा आणि ऊटीमध्येही केले जाणार आहे. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.