भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात आहेत. पण चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले असून लोकांना बाहेरच्या शहरात जायची परवानगी देण्यात आली आहे. पण काहीही गरज नसताना फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनावश्यक कारण असताना गाडी बाहेर काढणाऱ्या लोकांची गाडी जप्त केली जात आहे.
रणवीर शौरीची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून रणवीरने त्याबाबत मुंबई पोलिसांना ट्विटरवर टॅग केले आहे. त्याने ट्विटरद्वारे सांगितले आहे की, माझ्या घरी काम करणारी व्यक्ती त्याच्या गरोदर पत्नीला माझ्या कारने रुग्णालयात घेऊन गेली होती. पण पोलिसांनी त्यांना थांबवले आणि गाडी ताब्यात घेतली. गरोदर महिलेचे प्रसूती ही इर्मजन्सी नसल्याचे त्या संबंधित अधिकाऱ्याचे म्हणणे होते.
मला प्रचंड दुःख होत आहे की, माझ्या निर्दोष कर्मचाऱ्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. तीन तास झाले असले तरी मी केलेल्या तक्रारीवर कोणतेच उत्तर मला मिळालेले नाही. रणवीरने हे ट्वीट करताना मुंबई पोलिसांना टॅग केले होते. त्यानंतर काहीच मिनिटांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या ट्वीटला रिप्लाय करत रणवीरला योग्य ती मदत करण्याविषयी मुंबई पोलिसांना सांगितले.
आदित्य यांच्या ट्वीटनंतर रणवीरला त्याची जप्त केलेली गाडी मिळाली असून त्याने ट्विटरद्वारे याविषयी सांगितले आहे. त्याने ट्वीट केले आहे की, आठ तासानंतर मला माझी गाडी परत मिळाली असून कोणताही एफआयआर देखील दाखल करण्यात आलेला नाहीये. माझे आठ तास वाया गेले असले तरी पोलिसांवरील माझा विश्वास कायम आहे.