फेक व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि काजोल देवगणनंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत आलिया अश्लील हावभाव करताना दिसत होती. हा व्हिडिओ डीपफेक असल्याचं समोर आलं होतं. व्हिडिओतील मुलीचा चेहरा एडिट करून आलियाचा चेहरा लावण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी रश्मिकाचाही असाच डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये रश्मिका लिफ्टमध्ये येत असल्याचं दिसत होतं. एका इन्फ्लुएन्सरचा हा व्हिडिओ होता. त्यामध्ये रश्मिकाचा चेहरा एडिट करण्यात आला होता. याबाबत रश्मिकाने पोस्ट शेअर करत टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. आता आलियाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने प्रतिक्रिया दिली आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना रश्मिका म्हणाली, "काही काळापासून डीपफेक व्हायरल होत आहे. त्यामुळे आपल्याला आता ते सवयीचं झालं आहे. पण, ही चांगली गोष्ट नाही. मी नेहमी विचार करायचे की मी याविरुद्ध बोलण्याचं ठरवलं. तर याचा कोणी विचार करेल का? पण, सिनेइंडस्ट्रीतील लोकांनी मला पाठिंबा दिला, याचा मला आनंद आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं किती गरजेचं आहे, हे मला समजलं. मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की त्यांच्याबरोबर असं काही घडलं तर त्यांनी मदत घ्यावी."
दरम्यान, रश्मिका आणि काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कतरिना कैफचा एक फोटोही मॉर्फ करण्यात आला होता. भारतीय क्रिकेटर शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचाही असाच एक डीपफेक फोटो व्हायरल करण्यात आला होता.