माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनीलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे. रसिका सुनीलच्या आजीचे नुकतेच निधन झाले असून तिने आजीच्या आठवणीत सोशल मीडियावर भावनांना मोकळी वाट केली आहे.
रसिका सुनीलने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो सोबत आजीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले की, आजी, लहानपणीची एकही अशी आठवण नाही ज्यात आजी नाही. माझे बाबा युएसला असायचे. आई, मी, आजी, माझा भाऊ यश आणि आजोबा असे सगळे आम्ही घरी असायचो. तेव्हा आई घरचे बाबा होते आणि आजी घरची आई होती.
पुढे रसिका सुनील म्हणाली की, मी बाळ असताना मला आंघोळ घालून घरातल्या प्रत्येक आरशात 'हा पहा बाळ' असे म्हणत माझाच चेहरा दाखवत मला हसविणारी मग शाळा सुरू झाल्यावर मी झोपेतून उठल्यानंतर मला उचलून बाथरूम मध्ये नेऊन ठेवणारी. रसिका कधी तुझी दुपारची शाळा होते गं म्हणणारी. नेहमी गरम गरम जेवायला वाढणारी. घरात सतत काम करणारी, कधीही न थकणारी, रात्री अनेक गोष्टी सांगणारी, अनेक गाणी शिकवणारी, अतिशय सुंदर गाणारी. आम्ही किर्तनावरून आलो की अध्यात्म आणि विज्ञान याची किती सुंदर सांगड आहे ह्यावर चर्चा करणारी माझी (आई) आजी. ही काही दिवसांपूर्वी वारली. आजी तुझा अचानक निघून जाणे खूप चटका लावून गेले आहे. अपघात हे तुझ्या जाण्याचे कारण ठरणे चुकीचे होते. आठवण येते. तुझ्या आत्म्याला शांती लाभो.
रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती बसस्टॉप, गर्लफ्रेंड व गॅटमॅट चित्रपटात झळकली आहे.