सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत अभिनेत्री रसिका सुनील हिचा उल्लेख करावा लागेल. नुकतेच तिने सोशल मीडियावर लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. लग्न करणार असल्याचे सांगितल्यानंतर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. रसिकाने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या कपलचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले.
आता आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे रसिकाने आणि तिच्या पतीने ठरवले आहे. सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करुन प्री-वेडिंग फोटो शूट केलं जाते. रसिका आणि तिच्या पतीनेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. गोव्याच्या समुद्राकाठी या कपलने रोमँटीक फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटचा व्हिडीओही रसिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नाआधी रसिकाने तिच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राइज दिले आहे. यात रसिका आणि तिच्या पतीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हि़डीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. रसिका सुनिलच्या पतीचे नाव आदित्य बिलागी असे आहे.
आदित्य मुळचा औरंगाबादचा असला तरी तो गेल्या काही वर्षांपासून लॉस ऐंजिलीसमध्ये स्थायिक झाला आहे. रसिका आणि आदित्यची भेट लॉस ऐंजिलीसमध्ये झाली होती. तिथेच दोघांची चांगली मैत्री झाली आणि तिथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती.आता सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.