अलीकडच्या काळात मनोरंजनविश्वात अनेकांनी मोहाचा त्याग करत अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. काही जण पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅकही करतात. सध्या टीव्ही अभिनेत्री रतन राजपूतची (Ratan Rajput) चर्चा आहे. बऱ्याच काळापासून तीदेखील स्क्रीनवरुन गायब आहे. 'महाभारत' मालिकेत तिने राजकुमार अम्बाची भूमिका निभावली होती. मात्र आता ती अभिनयापासून दूर गेली आहे. नुकतंच रतन प्रेमानंद महाराज यांच्या चरणी लीन झाली आणि तिने त्यांना मनातले प्रश्नही विचारले.
'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' मालिकेतून रतन राजपूत नावारुपाला आली. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. यामध्ये ती प्रेमानंद महाराजांच्या चरणी लीन झाली आहे. तिने अभिनयाला रामराम केला आहे. तिने प्रेमानंद महाराजांना विचारले, 'मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर आहे. यानंतर माझं अभिनयात मन रमत नाही. मी अध्यात्म आणि अभिनय सोबत कसं करु शकते?'
यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, "बघा जेव्हा तुम्हाला समजतं की ही खोटी नोट आहे तर ती उचलावी वाटत नाही. अध्यात्म म्हणजे सत्य विषय आहे. जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा असत्य असलेल्या अभिनयाची आवड कशी राहील. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला सेवा करायची आहे आणि ही देवाची सेवा आहे. जसं मला गुरु मंचचा अभिनय करावा लागतो. तसा हा एक नाटक मंच आहे. इथे ना कोणी गुरु आहे ना शिष्य. एकच परमात्मा सर्व रुपांत आहे."
रतन राजपूतने गेल्या काही वर्षांपूर्वी गंभीर आजाराचा सामना केला. तिला लाईटही सहन व्हायचा नाही. म्हणूनच ती डोळ्यावर डार्क ग्लासेस घालायची. ऑटोइम्युन रोगाचं तिला निदान झालं जो तिच्या डोळ्यांना प्रभावित करायचा. आता तिच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.