Ratan Tata Bollywood Film: दिवंगत भारतीय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांचा साधेपणा आणि भारतासाठी त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच लक्षात राहील. टाटा उद्योग समूह जगभरात पोहोचवण्यात त्यांनी मोठं काम केलं. उद्योग क्षेत्रात मोठं काम केलेल्या रतन टाटा यांनी बॉलिवूडमध्येही हात आजमावला होता. त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली होती. पण, तो चित्रपट मोठा फ्लॉप ठरला होता. पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये पैसा गुंतवला नाही.
अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेल्या सिनेमात रतन टाटा यांनी पैसा लावला होता. २००० मध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि अमिताभ बच्चन अभिनित एका रोमँटिक थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त या चित्रपटात जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू होते. तसेच सुप्रिया पिळगावकर, अली असगर, अमरदीप झा आणि टॉम अल्टर यांच्याही भूमिका होत्या. हा २३ जानेवारी २००४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. पण, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही आणि वाईटरित्या फ्लॉप झाला. तो चित्रपट होता 'ऐतबार'.
९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या 'ऐतबार' चित्रपटानं फक्त भारतात ४.२५ कोटी रुपये कमवले, तर जगभरात ७.९६ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाची वाईट अवस्था पाहून रतन टाटा यांनी पुन्हा चित्रपट व्यवसायात पैसे गुंतवले नाहीत. 'ऐतबार' हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
रतन टाटा हे हे जगातील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक होते. गेल्यावर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. युवकांसाठी ते प्रेरणास्थान होते. स्वप्ने साकारायची असतात आणि करुणा, विनम्रता बाळगत यश साध्य होऊ शकते, याचा धडाच त्यांनी तरुण पिढीला दिला. आपल्या कामातून त्यांनी असंख्य आयुष्यांना स्पर्श केला आणि अनेक स्वप्ने जोपासली. तरुणांच्या स्वप्नात ते आजही जिवंत आहेत.