‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) म्हणजे महाराष्ट्राला खळखळून हसवणारा शो. या कार्यक्रमाच्या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. तुम्हीही या कार्यक्रमाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या कार्यक्रमात आता ‘शेवंता’ येतेय. होय, ‘शेवंता’ म्हणून घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हास्यजत्रेच्या मंचावर हास्याचा धमाका करताना दिसणार आहे. नुकताच या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. ‘हास्यजत्रेच्या मंचावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर करणार हास्याचा धमाका. पाहा, महाराष्ट्राची हास्य जत्रा,’ असं हा प्रोमो शेअर करताना लिहिलं आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अपूर्वाने शेवंताची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या सीझनमध्येही अपूर्वा होती. पण अचानक तिने ही मालिका सोडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.
मालिका सोडण्यामागचं कारण देखील तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं. सेटवर काही कलाकारांकडून तिला चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली जात असल्याचे तिनं म्हटलं होतं. ‘शेवंता या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही निगेटिव्ह कमेंट आल्या. त्यांचा मी फेस केल्या परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी या वाढलेल्या वजनावरून विनाकारण माझे विडंबन केले. माझी उघडपणे खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स ह्या जाणीवपूर्वक मला जिव्हारी लागतील अशा केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही नवख्या कलाकारांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही,’ असा आरोप अपूर्वान तिच्या पोस्टमधून केला होता.
अपूर्वाने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलेय. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत तिने राणी चेन्नमा ही भूमिका साकारली होती. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोच्या निमित्ताने अपूर्वा पहिल्यांदाच कॉमेडी करताना दिसणार आहे.