छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेची ३ यशस्वी पर्व गाजली. तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. यातील एक लक्षवेधी भूमिका म्हणजे सरिताची. अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये ही भूमिका अगदी चोख बजावतेय. सरिताच्या व्यक्तिरेखेचा प्रवास अगदी रंजक असून प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली आहे.
‘सरिता बोलता म्हणून तेचा ताँड दिसता’ त्याचप्रमाणे ‘गे बाय माझे…’ हे सरिताचे संवाद प्रेक्षकांच्या ओठावर रुळले आहेत.प्रेक्षकांचा या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, "मालिकेत सरिता फार बोलताना दिसते. सरिताची भूमिका जोवर सोशिक सून होती, तोवर लोकं आवर्जून भेट घेत असत. पण जसजशी सरिता या भूमिकेत कॅरेक्टरवाइज बदल होत गेले, ती सोशिकतेतून जशी कजाग होत चालली तसतशी लाेकं लांबूनच हात दाखवतात. पहिले अंदाज घेतात आणि मगच हाक मारतात.
सोशिकतेतून बिनधास्तपणाकडे झालेला सरिताचा हा प्रवास अगदी रंजक आहे." सरिता आणि प्राजक्तामध्ये काय फरक आहे हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, "सरिता आणि प्राजक्ता रिअल लाइफमध्ये फार वेगळ्या आहेत. स्टोरी आणि रिअल लाइफ यात फरक असताेच. स्त्रीयांनी सहन करत बसणं, नमतं घेणे या गोष्टी मला न पटणाऱ्या आहेत. स्त्रीला स्वत:चं मत असावं या विचारांची मी आहे. सोशिक सरितापेक्षा अन्याय सहन न करणारी सरिता माझ्याकडून मनापासून साकारली जाते."