नव्वदीचं दशक गाजवणारी बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन (Raveena Tandon) हिचा आज वाढदिवस. रवीनानं एक काळ गाजवला. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल लाईफमधील लव्ह अफेअर्सची चर्चाही खूप झाली. बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकहाण्यांचा अंत दु:खद झाला. रवीना आणि अक्षय कुमार ( Akshay Kumar ) यांची प्रेमकहाणी अशीच एक प्रेमकहाणी. 90 च्या दशकात ‘मोहरा’ या चित्रपटात अक्षय व रवीनाची वर्णी लागली. शूटींग सुरू झालं आणि तशी दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली. दोघेही एकमेकांसोबत दिसू लागले. रवीना अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अगदी एका पायावर अक्कीशी लग्न करायला तयार होती. त्याच्यासाठी अगदी पीक वर असलेलं करिअर सोडायलाही राजी होती. अगदी तिनं सिनेमे साईन करणंही थांबवलं होतं. कारण लग्नानंतर रवीनानं काम करू नये, अशी अक्षयची इच्छा होती. असं म्हणतात की, अक्षय व रवीनानं गुपचूप साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. क्षणात सगळं संपलं.
1996 मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ च्या रिलीजवेळी गोष्टी बदलल्या. होय, अचानक रवीनाच्या कानावर अक्षय-रेखाच्या लिंकअपच्या बातम्या आल्या आणि रवीना हादरली. अक्षयच्या ‘रंगेल’ स्वभावामुळे ती आधीच वैतागली होती. अशात रेखासोबतची त्याची वाढती जवळीक पाहून रवीनाला धक्का बसला. रवीना त्याचं हे वागणं सहन करू शकली नाही. नातं तोडण्यासाठी हा ‘धोका’ पुरेसा होता. अक्षयने माफी मागून पाहिली, पुन्हा असं वागणार नाही, म्हणून गयावया केली. पण रवीना बधली नाही.
पुढे 1999 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने अक्षयवरची सर्व भडास काढली होती. ‘अक्षय ज्या स्पीडने मुलींना प्रपोज करत आहे, त्या स्पीडने मुंबईतील अर्ध्यापेक्षा जास्त तरूणींच्या आई-वडिलांना त्याला मॉम-डॅड म्हणावं लागेल,’ असं ती म्हणाली होती.मला एक सामान्य आयुष्य जगायचं होतं. यासाठी मी अॅक्टिंग करिअर सोडायलाही तयार होते. पण काहीचं मनासारखं घडलं नाही, असंही ती या मुलाखतीत म्हणाली होती.अक्षयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रवीनाच्या आयुष्यात अनिल थडानीची एन्ट्री झाली. अनिल थडानी घटस्फोटित होता. 2003 साली रवीनाच्या वाढदिवशी अनिलने तिला प्रपोज केलं आणि रवीनाने क्षणात होकार दिला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघेही लग्नबंधनात अडकले.