रवीना टंडन, फराह खान, भारती सिंगविरोधात एफआयआर; जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 10:09 AM2019-12-26T10:09:57+5:302019-12-26T10:15:03+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. होय, या तिघींविरोधात पंजाबातील अमृतसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवीना, फराह आणि भारती या तिघींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
आता हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊ या. तर या प्रकरणाची सुरुवात झाली ती एका व्हिडीओमुळे. एका इव्हेंटमधील हा व्हिडीओ असल्याचे कळतेय. इव्हेंटमध्ये या तिघी अशा काही बोलल्या की, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. शिवाय रवीना, फराह आणि भारतीला तिथल्या लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागली.
प्राप्त माहितीनुसार, एका खासगी वेब व युट्यूब चॅनलसाठी बनवण्यात आलेल्या कॉमेडी प्रोग्राममध्ये ख्रिश्चन धर्माशी निगडीत काही अपमानास्पद शब्दाचा प्रयोग केला गेला. त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला ते ख्रिश्चन धर्माचा अपमान करणारे असल्याचा आरोप करत, संबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम काल ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित करण्यात आला होता. या प्रकारानंतर अमृतसरच्या अजनाला येथे ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी निदर्शने केली. यानंतर संबंधित व्हिडीओची तपासणी केल्यानंतर काल रात्री पंजाब पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
कलम 295-अ नुसार रवीना, फराह आणि भारती यांच्या विरोधात केस दाखल केली आहे. अद्याप रवीना, फारह किंवा भारती यांच्यापैकी कोणीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता या तिघीही या प्रकरणावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.