बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याचे आजवर असंख्य सिनेमा सुपरहिट झाले आहेत. मात्र, काही सिनेमा असे आहेत जे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे तेरे नाम. २००३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. इतकंच नाही आजही या सिनेमाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. या सिनेमाल सलमान खानसोबत अभिनेत्री भूमिका चावला आणि रवी किशन यांनीही स्क्रीन शेअर केली होती. परंतु, या सिनेमाच्या सेटवर रवी किशन कायम सलमानपासून अंतर राखून राहत होते. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये रवी किशन यांनी सलमानपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं.
'तेरे नाम' मध्ये रामेश्वर ही भूमिका साकारणाऱ्या रवी किशन यांना सलमान खानसोबत काम करायची इच्छा होती. या सिनेमाच्या निमित्ताने ती इच्छाही पूर्ण झाली. मात्र, प्रत्यक्षात सलमानसोबत काम करायची वेळ आली त्यावेळी रवी किशन त्याच्यापासून दूर पळू लागले. अलिकडेच रवी किशन यांनी लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला.
"प्रत्येक कलाकार हा थोडा मूडी असतो. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर लगेच त्याचा मूड कसा आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यामुळे मी ज्यांच्यासोबत काम करतो त्या प्रत्येक कलाकाराला त्याची थोडी स्पेस देतो. सलमानसोबतही मी तेच केलं. कारण, त्यावेळी तो त्याच्या वाईट काळातून जात होता", असं रवी किशन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "त्याला पाहिल्यावरच मला कळायचं की भाईजानचा मूड आज चांगला नाहीये. त्या सिनेमात सलमान राधे ही भूमिका साकारत होता. या भूमिकेत खूप खोलवरचा अर्थ दडला होता. त्यामुळे या भूमिकेला पूर्ण न्याय मिळावा अशी दिग्दर्शक सतीश कौशिक यांची इच्छा होती. म्हणूनच, सलमान कायम त्या भूमिकेत गुंतलेला असायचा. त्याच कारणामुळे, मी सेटवर त्यांच्यापासून दूर राहीन असं मनाशी ठरवलं होतं. पण सिनेमाचं पॅकअप झाल्यावर आम्ही एकत्र डिनर करायचो किंवा सहज भेटायचो. त्यामुळे आमची छान मैत्री झाली. आम्ही दोघंही बांद्र्यात रहात असून सोहेल आणि मी लहानपणापासून चांगले मित्र होतो. पण, त्यावेळी मी स्टार नव्हतो. आणि, तो सुपरस्टार होता. मात्र, या सिनेमानंतर आमची छान मैत्री झाली
दरम्यान, तेरे नाम हा सिनेमा २००३ मध्ये रिलीज झाला होता. त्यापूर्वी २००२ मध्ये सलमानवर हिट अँड रन प्रकरणी आरोप करण्यात आले होते. इतकंच नाही तर याच काळात त्याचं आणि ऐश्वर्या राय हिचं नातंही ब्रेकअपपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे सलमानसाठी तो काळ प्रचंड कठीण होता.