भोजपुरी चित्रपटसृष्टीला देखील सध्या चांगले दिवस आले आहेत. अनेक भोजपुरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहेत. अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्याला रवी किशन हा अभिनेता पाहायला मिळतोय. आज त्याला भोजपूरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार मानले जाते. बिग बॉस या कार्यक्रमामुळे तर त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील जिंदगी झंड बा... हा त्याला डायलॉग तर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. रवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सलमान खानसोबत तेरे नाम या चित्रपटात झळकला होता. तसेच फिर हेरा फेरी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. पण रवीसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. रवी अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्या खिशात एक रुपयादेखील नव्हता. त्यानेच ही गोष्ट त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे. रवी हा मुळचा उत्तर प्रदेश मधील जौनपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे. रवी १९९० साली मुंबईत करियर करण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्याकडे राहायला घर देखील नव्हते. एवढेच काय तर खाण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नसायचे. अनेक दिवस तो केवळ वडापाव खावून राहायचा. जे काम मिळेल, ते करायला तयार असायचा. काम नाही मिळाले तर रात्री उपाशीपोटी त्याला झोपावे लागायचे. ऑडिशनला जाण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नसायचे. तो कित्येक किलोमीटर चालत जायचा. पण त्याने कधी जिद्द सोडली नाही. मुंबईत आल्यानंतर वर्षभरानंतर त्याला पितांबर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने काजोलसोबत उधार की जिंदगी या चित्रपटात काम केले. पण या चित्रपटातील त्याची भूमिका देखील तितकीशी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली नाही. आर्मी या चित्रपटाने त्याला एक अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर त्याला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या. त्याचे अनेक भोजपुरी चित्रपट हिट झाले. बिग बॉस या कार्यक्रमाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.
एकेकाळी एक रुपयाही नव्हता खिशात, आता बनला आहे सुपरस्टार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:45 PM