मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं १५ जुलैला निधन झाले. पुण्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी याबद्दल गश्मीर (Gashmeer Mahajani)ला कळवले. त्यांच्या निधनानंतर ते एकटेच पुण्यात राहत होते हे सर्वांना समजले. त्यानंतर यावरुन नेटकऱ्यांनी गश्मीरला ट्रोल केले होते. त्यावर गश्मीरने वेळ आली की याबद्दल सांगेन असं म्हटलं होतं. दरम्यान आता एका मुलाखतीत गश्मीरने बरेचसे खुलासे केले आहेत.
सौमित्र पोटेच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये गश्मीर महाजनीने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. रवींद्र महाजनी एकटे राहत होते तर त्यांना सिक्युरिटीची गरज नव्हती का?, असेही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते. त्यावर गश्मीर म्हणाला की, तुम्हाला माहितीच आहे की माझे वडील देखणं आणि रांगडं होतं. जर त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणत्या माणसाची नेमणूक केली असती तर त्याला त्यांनी मुस्कटात मारून परत पाठवले असते. त्यांना सुरक्षेची अजिबात गरज नव्हती, ते अत्यंत खंबीर होते. त्यांच्याजवळ कायम लायसन्स असलेली आणि भरलेली बंदुक असायची, जी आम्हाला पोलिसांनी दिली. आता ती मी पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. ते असेच होते आणि ही त्यांची जगण्याची पद्धत होती. ते कायम एका स्टारप्रमाणे जगले.
गश्मीर महाजनीने वडिलांच्या जीवनातील अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले आहेत. रवींद्र महाजनी यांची जगण्याची पद्धतच वेगळी होती. त्यांना कुटुंबासोबत राहायला आवडत नव्हते. त्यांना स्वतंत्र राहायला आवडायचे. त्यांना स्वतःचा स्वयंपाक स्वतःला बनवायला आवडायचा. दुसरे कुणी त्यांची केलेली काम त्यांना मान्यच नव्हते असेही गश्मीरने सांगितले. तसेच त्याला ट्रोलिंगचा फरक पडत नाही, असेही सांगितले.